धार्मिक व पर्यटन स्थळे
१. शनि मंदिर, शनि शिंगणापूर ता. नेवासा
नेवासा तालुक्यात अहमदनगरपासून ३५ कि. मी. अंतरावर हे शनीचे जागृत देवस्थान आहे. येथे शनिदेवाची ५ फूट ९ इंच उंचीची स्वयंभू मूर्ती आहे जी एक संगमरवरी चौथन्यावर उभी आहे. या ठिकाणचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मंदिर नाही अथवा मूर्तीवर कुठलेही छत अथवा छाया नाही. सुमारे ४००० लोकसंख्या असलेल्या या गावात कोणत्याही घरास दरवाजा नाही. इतकेच नाही तर कपाटे, सुटकेस इत्यादीसही कुलूप नाही. दर शनि अमावास्येस या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.
२. दत्तमंदिर, देवगड, ता. नेवासा
नेवासापासून थोड्याच अंतरावर हे प्रसिद्ध रमणीय दत्त क्षेत्र आहे. मंदिराच्या भोवती सुंदर बाग तयार करण्यात आलेली आहे. अत्यंत हिरवागार असलेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहे. या मंदिराच्या पाठीमागून प्रवरा नदी वाहते. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नगरपासून ७० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. थोर संत किसनगिरी महाराज यांचे हे पवित्र स्थान आहे.
३. संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासे
नेवासे येथील करवीरेश्वराच्या मंदिरात संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ हा श्रीमद्भगवतीचे मराठीत निरुपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. यालाच आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. ज्या खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते खांब अजूनही नेवासे गावात आहे, असे भाविक सांगतात.
४. मोहिनीराज मंदिर, नेवासे
नेवासे येथे मोहिनीराजाचे एक प्राचीन मंदिर आहे. पौराणिक वर्णनाप्रमाणे भस्मासुर या उन्मत्त दैत्याचा निःपात करण्यासाठी श्रीविष्णूने मोहिनीचे रूप घेतले व भस्मासुराचा वध केला. ते ठिकाण नेवासे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. प्राचीन मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.