गोरखनाथ मंदिर
डोंगरगण, ता. अहमदनगर डोंगरगण हे अत्यंत सुंदर व रमणीय ठिकाण आहे. अहमदनगर शहरापासून १७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी गोरक्षनाथगढ या टेकडीवर नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांचे वास्तव्य होते. त्यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. मंदिर व मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे.
अहमदनगर किल्ला
अहमद निझामशहा याने हा किल्ला बांधला. भारतातील अभेद्य किल्ल्यांमध्ये या किल्ल्याची गणना होते. किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे. भिंतींची उंची १८ मीटर इतकी आहे. किल्ल्याला २४ बुरूज आहेत. किल्ल्याच्या संरक्षणप्रणालीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ३० मीटर रुंदीचा व ४ ते ६ मीटर खोलीचा खंदक आहे. किल्ल्याचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. अनेक सत्तांच्या ताब्यातून हा किल्ला गेलेला आहे. राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना याच किल्ल्यात कैद करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हा किल्ला साक्षीदार आहे.
विशाल गणपती
माळीवाडा अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेले हे प्राचीन गणेशस्थान आहे. या ठिकाणी श्री गणेशाची ११ फूट उंचीची विशाल मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.
श्री साईबाबा मंदिर, शिर्डी, ता. राहता
भारतातील सर्वधर्माच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांचे मंदिर शिर्डी या ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्र व्यवस्थापनाचा आदर्श म्हणून या ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापनाकडे पाहिले जाते. साईबाबांचे वास्तव्यस्थान शिर्डी हे होते.